
लोखंडी रॉडने घात केला; मोटारसायकलची तोडफोड करून अपघाताचा बनाव; अथणी पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ
अथणी : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील शिरूरजवळ उघडकीस आली आहे. पतीचा लोखंडी रॉडने निर्घृण खून केल्यानंतर मोटारसायकलची तोडफोड करून हा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र अथणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या खुनाचा पर्दाफाश केला असून पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
महांतेश बसाप्पा धनाळे (वय ३२) आणि रेणुका चंद्रकांत शिवपुंजी (वय ३१), दोघेही रा. खेडगाव, ता. अथणी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.
खेडगाव येथील चंद्रकांत संगप्पा शिवपुंजी (वय ४१) याचा ८ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान शिरूरजवळील गोऱ्याजवळ ओढ्यानजीक खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाजवळ मोटारसायकलची तोडफोड करून चंद्रकांतचा अपघात झाल्याचे भासवण्यात आले. या घटनेप्रकरणी मृताचा भाऊ सुरेश यांनी अथणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
ऊसतोडणीच्या निमित्ताने ओळख; अनैतिक संबंधात रूपांतर
आरोपी महांतेशची ऊसतोडणी कामगारांची टोळी आहे. या टोळीत चंद्रकांतही काम करीत होता. याचदरम्यान महांतेशची चंद्रकांतची पत्नी रेणुका हिच्याशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले. या संबंधांची परिसरात चर्चा सुरू झाल्याने चंद्रकांत हा दोघांच्या संबंधातील अडथळा ठरत होता.
पहाटे मेसेज; दबा धरून हल्ला
चंद्रकांतचा अडथळा दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. ८ ऑगस्ट रोजी पहाटे रेणुकाने प्रियकर महांतेशला संदेश पाठवून शिरूरजवळील वळणावर येण्यास सांगितले. त्यानुसार महांतेश तेथे दबा धरून बसला होता.
चंद्रकांत तेथे आल्यानंतर महांतेशने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रकांतचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मोटारसायकलचीही तोडफोड केली आणि ती रस्त्यावर फेकून देत हा प्रकार अपघाताचा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या तपासाने बनाव उघड
मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींमुळे पोलिसांना अपघाताच्या कथेबाबत संशय आला. तपासाची दिशा खुनाकडे वळवत पोलिसांनी चौकशी केली असता पत्नी रेणुका आणि तिचा प्रियकर महांतेश यांचा या हत्येशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर अथणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, या धक्कादायक खून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta