
निपाणी (वार्ता) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील छत्तीसगड मधील दोन हिंदू स्थलांतरित मजुरांची करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’तर्फे येथील तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले.
निवेदनातील माहिती अशी, कुलगाम येथे दीपक (वय २४) आणि भूपेंद्र (वय २८) या दोन हिंदू मजुरांची त्यांची ओळख व नाव विचारून हत्या करण्यात आली. १९९० च्या काश्मीर खोऱ्यातील विस्थापनाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची ही दहशतवाद्यांची चाल असून, ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ सारख्या संघटनामागील संपूर्ण दहशतवादी परिसंस्थेचा बीमोड केला पाहिजे.
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. काश्मीरमध्ये कार्यरत सर्व परप्रांतीय हिंदू मजूर, व्यापारी आणि नागरिकांसाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करावा.
मृतांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत, शासकीय नोकरी व सुरक्षा द्यावी. सन १९९० नंतर विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या सन्मानपूर्वक पुनर्वसनासाठी कालमर्यादित राष्ट्रीय आराखडा तयार करावा.
यावेळी श्रीराम सेना कर्नाटकचे चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चेंडके, हिंदू जन जागृती समितीचे संदीप जाधव, सनातन संस्थेचे महेश मठपती, सागर बाळगूर्गी, मायाप्पा राऊत, अनिल बुडके, बबन निर्मले, योगेश चौगुले, अशोक नाईक यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta