
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी धारवाड विभागीय शिक्षण आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय
बेळगाव : ‘वाचाल तर वाचाल’ हे बोधवाक्य विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडावे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धारवाड विभागीय शिक्षण आयुक्तांनी शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठाच्या वेळी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम राबविण्याचा आदेश दिला आहे.
सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांसह विविध सरकारी विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या निवासी शाळा, वसतिगृहे आणि बालसंगोपन संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी दररोज सकाळच्या सत्रात दहा मिनिटे वृत्तपत्र वाचावे, अशा सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांना परिपत्रक पाठविण्यात आले असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कन्नड, मराठी, इंग्रजी आदी भाषांमधील वृत्तपत्रांचे वाचन करून घेण्यास सांगण्यात आले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आवश्यक वृत्तपत्रांची खरेदी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
वृत्तपत्र वाचनामुळे विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता आणि आकलनशक्ती विकसित होण्याबरोबरच त्यांना देश-विदेशातील विविध घडामोडींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, क्रीडा, आर्थिक तसेच स्थानिक विषयांबाबत विद्यार्थ्यांना नियमित माहिती मिळाल्याने त्यांच्या सामान्य ज्ञानातही भर पडणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शाळांमध्ये वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांना वर्तमान घडामोडींशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
‘दहा मिनिटांचे वृत्तपत्र वाचन, विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा’ अशी या उपक्रमाची संकल्पना असून, नियमित वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि माहितीचे आकलन करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta