

सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये संधी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत झालेला समझोता अखेर यशस्वी ठरला. महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांची निवडणूक बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी बिनविरोध पार पडली. प्रत्येक समितीवर सात सदस्यांची निवड झाल्याने एकूण २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
स्थायी समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पाच आणि विरोधी गटाचे दोन नगरसेवक असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सर्व सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोणत्याही समितीसाठी मतदानाची वेळ आली नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी जुलै महिन्यातच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. विद्यमान समित्यांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार असल्याने त्याच दिवशी नव्या समित्यांची स्थापना करण्यात आली.
दुपारी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. चारही समित्यांसाठी आवश्यक तेवढेच अर्ज दाखल झाल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
राजकीय पातळीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटामध्ये मतभेद असले तरी स्थायी समित्यांच्या निवडणुकीत मात्र दोन्ही बाजूंनी समन्वयाची भूमिका घेतली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य संघर्ष टळला असून, आता स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१७ ऑगस्टला अध्यक्षांची निवड
चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीनंतर अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता महापालिका वर्तुळात निर्माण झाली आहे.
चार समित्यांवर कोण?
अर्थ स्थायी समिती : मिरजकर ब्रह्मानंद (नंदू) अर्जुन, शंकर पाटील, रमेश श्रीकांत मैलुगोळ, रविराज सांबरेकर, टोपगी दीपाली संतोष, मोदिनसाब मतवाले आणि बसवराज मारुती मोदगेकर यांच्यासह सात सदस्यांची निवड झाली आहे.
आरोग्य स्थायी समिती : श्रीशैल शिवाजी कांबळे, राजू भातकांडे, चिक्कलदिन्नी रूपा, भागवत नेत्रावती विनोद, प्रिया दीपक सातगौड, श्यामोजीन सलीमखान पठाण आणि शाहिदखान गौसखान पठाण यांची निवड झाली.
बांधकाम स्थायी समिती : जयंत जाधव, श्रेयस नाकाडी, सविता पाटील, गिरीश धोंगडी, अभिजीत जवळकर, लक्ष्मी लोकरी, खुर्शीद मुल्ला.
लेखा स्थायी समिती : सारिका पाटील, रेश्मा कामकर, माधवी राघोचे, जयतीर्थ सौंदत्ती, नितीन जाधव, शिवाजी मंडोळकर, आफरोज मुल्ला.
मतदान टळले, पण अध्यक्षपदाची रंगत वाढली!
चारही समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता १७ ऑगस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे महापालिका राजकारणाचे लक्ष लागले आहे. स्थायी समित्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ निश्चित झाल्याने पुढील राजकीय समीकरणेही यानंतर स्पष्ट होणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta