

प्रगती नगरातील घटना; माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय
निपाणी (वार्ता) : घरातील कचरा घंटागाडीला देताना घाईगडबडीने तीन लाखाचे सोन्याचे दागिने नगर पालिकेच्या घंटागाडीत दिले होते. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधून काढत प्रामाणिकपणे संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे आधुनिक युगातही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला.निपाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी, येथील प्रगती नगरातील रहिवासी सुशीला बल्लारी यांनी सुमारे दोन तोळे वजनाचे दोन सोन्याचे हार एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. नेहमीप्रमाणे नगरपालिकेची घंटागाडी घरासमोर कचरा संकलनासाठी आली. त्यावेळी सुशीला बल्लारी या घराबाहेर गेल्या होत्या. त्यांचा मुलगा कपिल बल्लारी याने सदर प्लास्टिक पिशवीतील वस्तू कचरा असल्याचे समजून कचऱ्यासोबत घंटागाडीत टाकली. काही वेळाने सुशीला बल्लारी घरी परतल्यानंतर दागिन्यांची पिशवी कचऱ्यात गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कपिल बल्लारी यांनी तातडीने पट्टणकुडी हद्दीत असलेल्या नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पाकडे धाव घेतली. तेथे त्यांनी कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रकार सांगून दागिने शोधून देण्याची विनंती केली.
यावेळी घंटागाडीचे चालक विनायक ऐवाळे आणि कर्मचारी पिंटू सोनटक्के यांच्यासह अमर आवटे, विजय कुरंगे आणि महेंद्र कांबळे हे कर्मचारी प्रकल्पावर उपस्थित होते. बल्लारी यांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत या पाचही कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दागिन्यांचा शोध घेतला. सुमारे तासभर कचरा उपसून आणि तपासून अखेर कर्मचाऱ्यांना सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सापडली. त्यांनी ती कपिल बल्लारी यांच्या ताब्यात दिली.
तीन लाख रुपये किमतीचे दागिने सापडल्यानंतरही त्यावर कोणताही मोह न ठेवता संबंधित कुटुंबाला परत करणाऱ्या अमर आवटे, विनायक ऐवाळे, पिंटू सोनटक्के, विजय कुरंगे आणि महेंद्र कांबळे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta