

खंजर गल्लीतील मोहम्मदशफी तहसीलदारवर पोलिसांचा दणका; वर्षभर बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी, धारवाडला रवाना
बेळगाव : मटक्याच्या अवैध धंद्याने अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणीत ढकलणाऱ्या ६९ वर्षीय मटका बुकी मोहम्मदशफी मोदींसाब तहसीलदार याच्यावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध तब्बल ८२ गुन्ह्यांची नोंद असून, सातत्याने कारवाई करूनही मटक्याचा व्यवसाय सुरूच ठेवल्याने त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली. खंजर गल्ली परिसरात मटक्याचा व्यवसाय चालविणाऱ्या तहसीलदार याच्यावर यापूर्वी अनेकदा पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, कारवाईची भीती न बाळगता त्याने पुन्हा मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
८२ गुन्हे, तरीही धंदा सुरूच!
मटक्याच्या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असल्याने संबंधित व्यक्तीच्या कारवायांना वेळीच आळा घालणे आवश्यक होते. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवून परिसरातील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कर्नाटक पोलीस कायदा कलम ५९(जी) अन्वये तडीपारीची कारवाई केली.
१३ ऑगस्टला आदेश; थेट धारवाड जिल्ह्यात रवाना
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी तहसीलदार याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला बेळगाव जिल्ह्याबाहेर धारवाड जिल्ह्यात हलविण्यात आले आहे.
मटक्यासारख्या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक हानी होत असल्याने अशा व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta