

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण; राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णांच्या शौर्याला अभिवादन
बेळगाव : देशभक्तीचा उत्साह, राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण अशा वातावरणात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला.
ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णांच्या शौर्याची आठवण
बेळगाव जिल्ह्याला स्वातंत्र्यलढ्याची गौरवशाली परंपरा लाभली आहे. या भूमीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक शूरवीर घडविले. कित्तूर राणी चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा विशेष उल्लेख करत जिल्हाधिकारी रोशन यांनी त्यांच्या राष्ट्रभक्तीतून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
बेळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक आहे. जनतेला अधिक प्रभावी आणि तत्पर सेवा देत जिल्ह्याला विकासाच्या दिशेने आणखी पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करून राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस ‘जय हिंद! भारत माता की जय!’ या जयघोषाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.

Belgaum Varta Belgaum Varta