

बेळगाव : श्रावणाच्या पवित्र महिन्याची सुरुवात होताच वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील श्रद्धेचे दर्शन घडते. याच मंगलमय वातावरणात ‘वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया!’ असा भक्तिभाव मनात घेऊन श्रावणातील पहिला सण असलेली नागपंचमी बेळगाव शहर व परिसरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली.
नागपंचमीच्या निमित्ताने सकाळपासूनच घराघरांत मंगलमय वातावरण होते. नागदेवतेची प्रतिमा घरी आणून तिची विधिवत पूजा करण्यात आली. हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून नागोबाला गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. विशेषतः आळूचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा अनेक घरांमध्ये भक्तिभावाने जपण्यात आली.
भारतीय संस्कृतीत नागदेवतेला केवळ सर्परूपात नव्हे, तर निसर्ग, भूमी आणि सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करताना निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावनाही मनामनांत जागृत झाली.
श्रावणी सोमवार अन् नागपंचमी; भक्तीचा दुहेरी योग
यंदा नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्याने भक्तीचा दुहेरी योग जुळून आला. शिवभक्तांनी पहाटेपासूनच मंदिरांकडे धाव घेतली. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. नागदेवता आणि भगवान शिव यांच्याविषयी असलेल्या श्रद्धेमुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
महिला, मुली आणि भाविकांनी उपवासाचे आचरण करत शिवशंकराचे दर्शन घेतले. बेलपत्र, फुले आणि जल अर्पण करून ‘महादेवा, आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे’, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
फराळाच्या सुगंधाने दरवळली घरे
नागपंचमी म्हटले की बेळगावकरांच्या घरात फराळाची लगबग सुरू होते. चिवडा, लाडू, लाह्या, तंबिट तसेच विविध गोडधोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. उपवासाच्या पदार्थांनीही स्वयंपाकघर सुगंधित झाले. सण म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर कुटुंबाला एकत्र आणणारा आनंदाचा क्षण, याचा प्रत्यय प्रत्येक घरात आला.
झोक्यावर रंगली नागपंचमी
नागपंचमी आणि झोपाळा यांचे नातेही तितकेच जुने. अंगणात बांधलेल्या झोपाळ्यावर मुलींचे हास्य, गाण्यांचे सूर आणि झोक्यांची उंच भरारी यामुळे सणाचा आनंद अधिकच खुलला. ‘झोका दे गं सखी…’ म्हणत मुलींनी एकमेकींना झोके देत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
ग्रामीण भागात आजही ही परंपरा मोठ्या प्रेमाने जपली जाते. शहरातील अनेक घरांमध्येही झोपाळे बांधून नव्या पिढीला या संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीची प्रार्थना
नागपंचमीला भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याची परंपराही भावनिक आहे. ‘माझा भाऊ सदैव सुखी राहो, त्याला उत्तम आरोग्य लाभो आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो माझा पाठीराखा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहो,’ अशी मनोमन प्रार्थना करत बहिणींनी उपवास केला.
या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याची वीण अधिक घट्ट झाली.
श्रद्धेने केलेली पूजा, शिवनामाचा जयघोष, झोक्यांवरील आनंद, फराळाचा सुगंध आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाची भावना… या साऱ्यांनी बेळगावमध्ये नागपंचमीचा सण भक्ती आणि भावनेच्या रंगात रंगून गेला. आधुनिकतेच्या वेगवान युगातही परंपरेची मुळे जपणारी ही संस्कृतीच आपल्या सणांना आणि उत्सवांना खरी ओळख देत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta