
बेळगाव : येळ्ळूर येथे दि. २७ ऑगस्टपासून श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
१७ वर्षांखालील गटात सांघिक क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने थ्रोबॉलमध्ये, तर मुलींच्या संघाने खो-खोमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक स्पर्धांमध्ये सिद्धी कुगजी हिने ४०० मीटर व ३००० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळविला. वैदेही पाटील हिने उंच उडी व लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. संस्कार कुगजीने तिहेरी उडीमध्ये द्वितीय, चांगुना मेलगे हिने ३००० मीटरमध्ये द्वितीय, धनश्री कुगजीने ८०० मीटरमध्ये तृतीय, सरिता पाटीलने भालाफेकमध्ये द्वितीय, लक्ष्मीने गोळाफेकमध्ये द्वितीय व तिहेरी उडीमध्ये प्रथम, कोमल पाटीलने १५०० मीटरमध्ये प्रथम, चांगुना पाटीलने १५०० मीटरमध्ये द्वितीय, तर समीक्षा मुद्गेकरने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
१४ वर्षांखालील गटात मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मुलींच्या कबड्डी संघाने तसेच मुलींच्या रिले संघाने प्रथम क्रमांक मिळविला. मुलांच्या रिले संघानेही प्रथम क्रमांक पटकाविला.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये शयन चौगुलेने १०० व २०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक, राजवीर कदमने ६०० मीटरमध्ये द्वितीय, साहिल हलगेकरने लांब उडीमध्ये प्रथम, सोहम परशराम कुगजीने उंच उडीमध्ये प्रथम, तर दुर्वा संतोष पाटीलने १०० मीटर, ६०० मीटर व लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. भक्ती बिरजे हिने उंच उडी व अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला. सुप्रिया पाटीलने २०० मीटरमध्ये प्रथम, वीणा पाटीलने थाळीफेकमध्ये द्वितीय, तर मनोज पाटीलने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर तसेच ए. बी. कांबळे, टी. एस. बोकडेकर, वाय. बी. कंग्राळकर, एल. एस. बांडगे आणि व्ही. पी. गवाई यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक वाय. एन. मजुकर व सचिव प्रसाद मजुकर यांनी अभिनंदन करून आगामी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta