
अनंत चतुर्थीला डॉल्बीमुक्त मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात जपणार पारंपरिक उत्सव
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बेळगाव पोलीस आयुक्तालयात पोलीस प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था आणि शिस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा भव्य **आगमन सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आगमन सोहळ्यासाठी आवश्यक परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय
यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे चव्हाट गल्ली मंडळाच्या वतीने अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने ढोल-ताशा तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
चव्हाट गल्लीला बेळगावच्या गणेशोत्सवाच्या परंपरेत विशेष स्थान असून, अनेक वर्षांपासून या परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य सुरू आहे. आधुनिकतेच्या युगातही पारंपरिक वाद्ये, संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे संवर्धन करण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात येणार आहे.
अनंत चतुर्थीला वेळेत मिरवणुकीत सहभाग
अनंत चतुर्थीच्या दिवशी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत सुरू करून प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मिरवणुकीत सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
मिरवणुकीस होणारा अनावश्यक विलंब टाळून पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियोजनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन आणि मंडळाच्या समन्वयातून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
पोलीस प्रशासनानेही मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करत गणेशोत्सव काळात आवश्यक ते विशेष सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
चव्हाट गल्लीच्या शिस्तबद्ध परंपरेचे कौतुक
बेळगाव शहरातील गणेशोत्सवात चव्हाट गल्लीचे विशेष महत्त्व असून, येथील गणेशोत्सवाने धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा शिस्तबद्ध पद्धतीने जपल्या आहेत. चव्हाट गल्लीतील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीचे नियोजन इतर मंडळांसाठीही आदर्श ठरावे, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, मिरवणुकीत शिस्त राहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि धार्मिक-सांस्कृतिक वातावरण कायम राहावे, यासाठी प्रशासन आणि मंडळाने परस्पर समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस डीसीपी नारायण बरमनी, एसीपी संतोष सत्यनायक, मार्केट सीपीआय जी. एन. कालीमिरची यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार ॲड. अनिल बेनके, ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, उपाध्यक्ष प्रशांत कुडे, ज्योतिबा पवार, उमेश मेनसे, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, कार्याध्यक्ष सुनील जाधव, तसेच विनायक पवार, ऋषभ मोहिते, प्रियेश गोंडाडकर, निखिल पाटील, निलेश गुंडकल, पवन किल्लेकर, अभिषेक नाईक, अनंत हंगेरगेकर, प्रसाद पवार, रोहन जाधव, संदीप कामुले, गिरीश पाटील, शुभम तुडेकर, हरीश ताशिल्दार आणि गौतम पाटील यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta