
बेळगाव : उत्तर विभागीय स्तरावरील आठव्या कर्तव्यकूट-२०२६ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ पुरस्कारांची कमाई केली असून, विभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांक पटकावून शहर पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठव्या बेळगाव उत्तर विभागीय स्तरावरील कर्तव्यकूट-२०२६मध्ये बेळगाव शहर पोलीस दलाच्या पथकाने उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक आणि विशेष कौशल्य स्पर्धांमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच श्वान पथकाने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.
फिंगरप्रिंट, मेडिको-लीगल, हँडलिंग, लिफ्टिंग व पॅकिंग चाचणी, सायबर क्राईम ट्रॅकर तसेच डॉग स्क्वॉड आदी विविध विशेष विभागांमध्ये बेळगाव शहर पोलीस दलाने चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत ११ पदके आणि २ ट्रॉफींसह एकूण १३ पुरस्कार पटकावत पथकाने आपल्या व्यावसायिक कौशल्याचा ठसा उमटविला.
सीएलआर विभागाचे आरपीआय जे. एच. शेख यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे बेळगाव शहर पोलीस दलाचा गौरव वाढला आहे. या यशामध्ये मंजुनाथ बडिगेर, संतोष दलवाई, सरदारगौडा मुतत्ती, रुद्रय्या माविनकट्टीमठ, अजित आर. पाटील, एस. एम. गडकरी आणि राकेश तलवार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिस्तबद्ध कार्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे अधिक मोठी यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta