
भूषण बोरसे आज सोपवणार पदभार
बेळगाव : गणेशोत्सवामुळे लांबलेली बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण होणार आहे. २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम आज बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असून, मावळते आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे त्यांच्याकडे पदभार सोपवणार आहेत.
राज्य सरकारने २९ ऑगस्ट रोजी केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बोरसे यांची हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी, तर प्रकाश निकम यांची बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. मात्र, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी लक्षात घेता पदभार हस्तांतरण लांबले होते.
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडल्यानंतरच पदभार हस्तांतरित करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. अखेर गुरुवारी निकम अधिकृतपणे सूत्रे स्वीकारणार असल्याने याबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.
बेळगावशी निकम यांचे जुने नाते
प्रकाश निकम यांनी सेवाकाळाच्या सुरुवातीला बेळगाव ग्रामीण विभागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे शहर व परिसराची त्यांना पूर्वीपासूनच माहिती आहे. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta