
बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या बदलीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आगमन होताच त्यांचे मानाच्या सलामीने स्वागत करण्यात आले.

यानंतर प्रकाश निकम यांनी बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. धारवाड येथे बदली झालेले पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त प्रकाश निकम म्हणाले की, माजी आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव शहराच्या पोलीस प्रशासनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. त्या कामाचा आणि धोरणांचा आधार घेत पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येईल.
शहरातील गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही बेळगावमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने शहराची परिस्थिती आणि येथील विविध प्रश्नांची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवासह बेळगावमधील विविध धार्मिक व सार्वजनिक उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही नूतन आयुक्तांनी नमूद केले.
यावेळी मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह पोलीस विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta