Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षकांनी दिला ‘जीवनदानाचा’ धडा!

Spread the love

 

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा पंचायतीचे रक्तदान अभियान; जिल्हाभरात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : विद्यार्थ्यांना आयुष्यभर ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त आता रक्तदानातून ‘जीवनदानाचा’ आदर्श घालून दिला आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणी केलेल्या शिक्षकांसह शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिकांनाही रक्तदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हाभरात रक्तदान मोहीम राबविण्यात येत आहे. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. रक्तदानासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना ऑन-ड्युटी रक्तदानाची सुविधा देण्यात आली आहे.

शिबिराच्या प्रारंभी बेळगाव शहर शिक्षण विभागाचे बीईओ रवी बजंत्री यांनी स्वतः रक्तदान करून शिक्षकांसह इतरांनाही सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा संदेश दिला.

बेळगाव शहरात बीम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, केएलई हॉस्पिटल, एसबीजीआय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज (गणेशपूर) आणि सरकारी कन्नड शाळा क्रमांक २६, विश्वेश्वरय्यानगर अशा विविध केंद्रांवर रक्तदानाची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय बूथ उभारण्यात आले असून, दिवसभर रक्तदान करता येणार आहे.

बेळगाव शहरातून २७८, तर बेळगाव ग्रामीण भागातून २५७ शिक्षकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी हुक्केरी तालुक्यातून झाली आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांनी रक्तदानातून गरजू रुग्णांच्या जीवनाला आधार देण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ज्ञानदानासोबत जीवनदान’ देण्याचा संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत आहे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, आरोग्य मार्गदर्शन, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रक्तदान हे सामाजिक कर्तव्य मानून नागरिकांनीही स्वेच्छेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *