
जून-जुलै-ऑगस्टचे वेतन थकीत; आर्थिक अडचणींचा सामना, सणासुदीपूर्वी मानधन देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांवरील अध्यापनाचा भार सांभाळणाऱ्या अतिथी शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला तीन महिने उलटूनही जून, जुलै आणि ऑगस्टचे मानधन मिळाले नसल्याने अतिथी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मानधन वितरणाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुरळीत सुरू राहावी, यासाठी अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक शाळांमधील अध्यापनाचा मोठा भार सध्या याच शिक्षकांवर आहे. नियमित शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांच्या मानधनाबाबत मात्र उदासीनता दिसून येत असल्याची भावना अतिथी शिक्षकांनी व्यक्त केली.
अतिथी शिक्षकांना दरमहा १२ हजार रुपये मानधन दिले जाते. अनेक शिक्षकांच्या कुटुंबाचा मासिक आर्थिक ताळेबंद या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, सलग तीन महिन्यांचे मानधन थकीत असल्याने घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागविताना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही अडचण अधिकच गंभीर बनली आहे.
मानधनासाठी अनुदान मंजूर करून लवकरच रक्कम वितरित केली जाईल, अशी आश्वासने वेळोवेळी दिली जात असल्याचे अतिथी शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात मानधन वितरणासाठी अद्याप ठोस पाऊल उचललेले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या अतिथी शिक्षकांच्या आर्थिक अडचणींची शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन तत्काळ वितरित करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta