Sunday , September 20 2026
Breaking News

‘महामंडळ आपल्या दारी’ उपक्रमाला यश; केळकर बागेचा गणपती’ मंडळाचा मंडप अडथळा दूर!

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महामंडळ आपल्या दारी’ या उपक्रमाला यंदाही मोठे यश आले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ गेल्या महिन्याभरापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या उपक्रमांतर्गत मंडळांच्या अडचणी जागेवरच दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डिजिटल जाहिरात स्क्रीनचा अडथळा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी चौक येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ केळकर बाग मंडळाने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात बोलावून महानगरपालिकेने बसवलेल्या जाहिरात स्क्रीनबद्दल (टीव्ही पोल) चर्चा केली. हा जाहिरात स्क्रीन तेथील गणेश मंडपासाठी मोठा अडथळा निर्माण करत होता.
गेल्या वर्षी महामंडळाने सुचवली होती नवी जागा संबंधित गणेश मंडळाची मूर्ती गेल्या 23 वर्षांपासून दत्त मंदिरच्या बाजूला मंडप घालून बसवली जात होती. मात्र, मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या विनंतीनुसार आणि सर्वांच्या सोयीकरिता त्यांना बाजूलाच एक योग्य जागा दाखवण्यात आली होती. मागच्या वर्षापासून तिथेच मंडप उभारण्यात येत होता. परंतु, याच जागेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक डिजिटल जाहिरात स्क्रीन पोल बसवण्यात आल्यामुळे मंडळाला मंडप उभारण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती.
महामंडळाची धाव आणि नगरसेवकांचे आश्वासन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही अडचण सांगताच मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांनी तातडीने जागेवर जाऊन पाहणी केली. समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. नगरसेवक शंकर पाटील यांनीही कोणताही विलंब न लावता हा स्क्रीन तिथून हटवण्याचे आश्वासन दिले.

प्रशासनाकडून तातडीने कारवाई
नुकतीच महानगरपालिका आयुक्तांनी गणेश उत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती, त्यावेळीही त्यांना या समस्येची माहिती देण्यात आली होती. महामंडळाचा पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे अखेर आज तो जाहिरात स्क्रीन तिथून पूर्णपणे हटवण्यात आला आहे. यामुळे केळकर बागेचा गणपती मंडळाच्या मंडपाचा अडथळा दूर झाला असून कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
या महत्त्वाच्या कामासाठी कोणताही विलंब न लावता गणेश मंडळाला आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक शंकर पाटील यांचे महामंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले आहेत.
मंडळाचे परेश शिंदे, संजय पाटील, दत्ता जाधव व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *