Sunday , September 20 2026
Breaking News

श्री गणेश फेस्टिव्हल २०२६ चे बेळगावात भव्य आयोजन

Spread the love

 

महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा; मंगळागौर आणि ‘नवरत्न सत्कार’ ठरणार आकर्षण

बेळगाव : विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाची पर्वणी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘नवरत्न सत्कार’ अशा बहारदार कार्यक्रमांनी ‘श्री गणेश फेस्टिव्हल २०२६’ बेळगाव शहरात रंगणार आहे. ६ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमधील सर्व कार्यक्रमांना नागरिकांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.

फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता होणार आहे. यानंतर दुपारी ३ वाजता शास्त्रीनगर येथील ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत ‘मिलेट्स’ अर्थात तृणधान्यांपासून गोड आणि तिखट पदार्थ तयार करायचे आहेत. राळा, भगर, बाजरी, राजगिरा, नाचणी, चेना, कुटकी, कोदरा, कोराळे अथवा ज्वारी यापैकी कोणत्याही एका किंवा दोन तृणधान्यांचा वापर करून तयार केलेले पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत. दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रथम २ हजार, द्वितीय १,५००, तृतीय १ हजार रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

‘फ्री हॅण्ड’ रांगोळी स्पर्धेचीही पर्वणी

सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत ‘फ्री हॅण्ड’ रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २.५ बाय २.५ फूट आकारातील ही स्पर्धा १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत होणार असून स्पर्धकांना रांगोळी पूर्ण करण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १,२००, द्वितीय १,०००, तृतीय ७५० रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. पाककला आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

मंगळागौरने रंगणार सांस्कृतिक संध्या

मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता न्यू गुड्सशेड रोड येथील श्रीमाता सोसायटी सभागृहात नक्षत्र ग्रुप प्रस्तुत पारंपरिक ‘मंगळागौर’ आणि विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

‘नवरत्न सत्कार’ने होणार फेस्टिव्हलची सांगता

फेस्टिव्हलचा प्रमुख आकर्षण असलेला ‘नवरत्न सत्कार’ सोहळा बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीमाता सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवा, साहित्य, कला, संगीत, उद्योग, क्रीडा, श्रमसेवा, कृषी आणि सामाजिक संस्था या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात येणार आहे.

हा संपूर्ण फेस्टिव्हल श्री भक्ती महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., श्री राजमाता महिला मल्टिपर्पज सोसायटी लि., श्रीमाता को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आणि ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील उल्लेखनीय व्यक्तींच्या गौरवाचा हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, बेळगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या फेस्टिव्हलचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *