
प्रगतिशीलतर्फे आयोजित कार्यशाळेत इतिहास विषय शिक्षकांना मार्गदर्शन
बेळगांव : भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या म्हणजे इतिहास नव्हे. ज्या घटना साधनांवर व प्रमाणावर आधारित असतात तोच इतिहास होय, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. अवनिश पाटील यांनी केले.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबईच्या प्रेरणेने येथील प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने इतिहास विषय शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक कॉ. अनिल आजगावकर होते.
प्रारंभी प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यांच्याच हस्ते वक्ते प्रा. पाटील व अध्यक्ष आजगावकर यांचा पुस्तक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले कोल्हापूरचे सुप्रसिद्ध लेखक नंदकुमार मोरे यांचा प्रगतिशील लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, अशी मागणी करणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
यानंतर बोलताना प्रा. अवनिश पाटील म्हणाले, ज्याची उत्तरे देता येतात तो इतिहास व ज्याची उत्तरे देता येत नाहीत ती अख्यायिका असते.
चित्रपट, नाटक, कादंबरीत जे सांगितलं जातं तो इतिहास नव्हे. ते काल्पनिक असतं. भूतकाळातील व वर्तमान काळातील जो संवाद असतो तो इतिहास होय. इतिहास हा कसोटीवर तपासून पाहिला पाहिजे. इतिहास लिहिण्याची शैली असते. प्रामाणिकपणे इतिहास लिहिणे हे वैशिष्ट्य असते. इतिहासाच्या लेखनात समकालीन साधनांना महत्व असते. शिवकालीन इतिहासात शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे ही खरी साधने होत. दोनशे वर्षांनंतर लिहिलेल्या बखरीतील साधने तेवढी महत्वाची नसतात. मौखिक साधनं ही कमी प्रतीची असतात. इतिहास वाचकांचीही जबाबदारी असते. साधने खरी आहेत का याबाबत वाचकांनी प्रश्न विचारले पाहिजे. वाद हे इतिहासकारांसाठी व्हिजन असतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अनिल आजगावकर यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर प्रगतिशील लेखक संघाचे सदस्य अर्जुन चौगुले यांनी आभार मानले.
मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस विविध शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta