
गोकुळाष्टमीच्या उत्साहात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन; घरोघरी देवीपूजनासह सुवासिनींनी भरल्या एकमेकींच्या ओट्या
बेळगाव : ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोऽस्तुते…’ या देवीच्या मंत्रघोषात मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रावण मासातील शेवटचा शुक्रवार साजरा करण्यात आला. यंदा गोकुळाष्टमी आणि श्रावण शुक्रवार एकाच दिवशी आल्याने शहरासह परिसरातील घराघरांत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
परंपरेनुसार श्रीकृष्णाची पूजा-अर्चा करण्याबरोबरच सुवासिनींनी वैभव लक्ष्मी व्रताचे आचरण केले. घरोघरी देवीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर सुवासिनींनी एकमेकींच्या ओट्या भरून सौभाग्य, समृद्धी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने चिमुकल्या राधा-कृष्णांनीही पारंपरिक वेशभूषेत या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. बालगोपाळांच्या या सहभागामुळे घराघरांतील उत्साहाला आणखी उधाण आले. कृष्णजन्माच्या आनंदात भक्तिमय वातावरण अधिकच रंगून गेले.
श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रताचे विधिवत उद्यापन करण्यात आले. यानिमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीची आराधना करण्यात आली. पूजा, आरती, ओटी भरणे आणि नैवेद्याच्या माध्यमातून श्रद्धा व भक्तिभावाने श्रावण शुक्रवारची सांगता करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta