
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात सुरू असलेल्या विकासकामादरम्यान मजुरांना तब्बल १४ प्राचीन सोन्याची नाणी सापडली. मात्र, ही नाणी स्वतःकडे न ठेवता मजुरांनी ती तातडीने इंचल ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.

इंचल गावातील बीसीएम हॉस्टेल परिसरात विबिजी रामजी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान मजुरांना ही नाणी सापडली. नाणी मिळताच त्यांनी ती कोणताही स्वार्थ न बाळगता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.
नाणी स्वीकारल्यानंतर पंचायत विकास अधिकारी, उपतहसीलदार, ग्राम प्रशासन अधिकारी, ग्रामस्थ तसेच नाणी शोधणारे मजूर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पंचनामा व अहवालासह ही सर्व १४ नाणी पुढील कारवाईसाठी तालुका पंचायत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, ही नाणी नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, याबाबत संबंधित तज्ज्ञ व सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी झाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही नाणी तलकाडच्या पश्चिम गंग राजवंशाच्या किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या नाण्यांमध्ये ‘गजपती वराह’, ‘वराह’ आणि ‘पगड’ प्रकारातील सोन्याची नाणी असल्याचे सांगण्यात आले आहे.
नाण्यांवर अलंकृत हत्तीचे चित्र असून, गंग राजघराण्याचे राजचिन्ह मदजल सोडणारा हत्ती होते. त्यामुळे अशा नाण्यांना ‘गजपती गद्याण’ किंवा ‘गजपती वराह’ म्हणून ओळखले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ही नाणी साधारणतः इ.स. १०व्या शतकापासून ते १५व्या शतकातील मध्ययुगीन कर्नाटक काळाशी संबंधित असण्याची शक्यता असून, ती शुद्ध किंवा उच्च दर्जाच्या सोन्यापासून तयार करण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कामाच्या ठिकाणी सापडलेल्या मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द करणाऱ्या मजुरांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांनी ४ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील अहवाल सादर करून नाणी नियमानुसार सक्षम प्राधिकरणाकडे सुपूर्द करून पुढील कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta