
बेळगाव : शहरात होणाऱ्या भव्य गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सक्रिय राऊडीशीटरची परेड घेण्यात आली. नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी राऊडीशीटरना कडक शब्दांत इशारा देत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर राऊडीशीटरची परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये १२५ हून अधिक राऊडीशीटर सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांना कायदा हातात न घेण्याची सक्त ताकीद दिली.
यावेळी आयुक्तांनी राऊडीशीटरच्या हालचाली आणि त्यांच्या सध्याच्या कारवायांबाबत विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विशेषतः सक्रिय राऊडीशीटरना बोलावून त्यांना थेट आणि कडक इशारा देण्यात आला.
“गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे दहशत निर्माण करणे, गोंधळ घालणे किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.
मार्केट, माळमारुती, एपीएमसी, कॅम्प, बेळगाव ग्रामीण, शहापूर, उद्यमबाग आणि मारिहाळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील राऊडीशीटरना या कारवाईअंतर्गत इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या नावाखाली शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणतीही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून, शहरातील संशयित आणि सक्रिय राऊडीशीटरच्या प्रत्येक हालचालीवर बेळगाव पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta