
बेळगाव : शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर), आदर्श ईरय्या हिरेमठ (२५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) आणि मणिकंठ राचय्या उगरखोड (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी बेळगाव शहरातील यडियुरप्पा मार्गाजवळील सागर किनारा ढाब्याजवळ दुचाकीवर गांजा ठेवून विक्री सुरू केली होती.
याची माहिती मिळताच सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री व पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १०० ग्रॅम गांजा, ५ हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि १ लाख २० हजार रुपये किमतीची हिरो एक्स्ट्रीम दुचाकी जप्त करण्यात आली.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(बी)(ii)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta