Sunday , September 20 2026
Breaking News

तारांगणच्या कलाविष्कारातून दिला सामाजिक संदेश

Spread the love

 

ओवी, भारूड, मंगळागौर, फॅशन शो आणि ग्रुप डान्सने कार्यक्रमात रंगत

बेळगाव : ओवी, भारूड, मंगळागौरीचे खेळ, फॅशन शो आणि ग्रुप डान्स अशा विविधरंगी कलाप्रकारांच्या सादरीकरणातून ‘तारांगण’चा कलाविष्कार जल्लोषात साजरा झाला. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अम्फी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर निधी कामत, सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेनसे, साहित्यिका डॉ. मनीषा नाडगौडा, उद्योजिका पूनम हंगीरगेकर आणि तारांगणच्या संस्थापिका अरुणा गोजे-पाटील उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. माऊली भजनी मंडळाने ईशस्तवन व स्वागतगीत सदर केले. तारांगणच्या केंद्र संचालिकांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुण्या निधी कामत म्हणाल्या, “महिला नेहमी बचत करत असतात; मात्र त्यांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना डोळसपणे निर्णय घेतला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून, स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणे ही कौतुकाची बाब आहे.”
डॉ. मनीषा नाडगौडा यांनी मार्गदर्शनपर भाषणात पालकांनी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या करिअरकडेही लक्ष द्यावे, असे सांगितले. “मुलांना वाचनाची सवय लावा आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा,” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात क्रांती महिला मंडळ, सविता मंगळागौर ग्रुप, योगा महिला मंडळ आणि तारांगण मंगळागौर ग्रुप यांनी मंगळागौरीचे विविध खेळ सादर केले. भारूडातूनही सामाजिक प्रबोधन करण्यात आले. स्मिता किल्लेकर, सरिता सूर्यवंशी आणि कल्पना चौगुले यांनी ओव्या सादर केल्या. समाजातील चुकीचे चित्र बदलण्याची गरज आणि सामाजिक जागृतीचा संदेश ओव्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.
स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीने ग्रुप डान्स सादर करून उपस्थितांची दाद मिळवली, तर सरस्वती इन्फोटेकच्या विद्यार्थिनींनी फॅशन शो सादर केला. राजश्री हावळ आणि अस्मिता आळतेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालिका जयश्री दिवटे, सुधा मानगावकर, सविता वेसणे, अर्चना पाटील, गीता घाडी, शारदा भेकणे आणि स्मिता मेंडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अनेक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

एकूणच महिलांच्या कलागुणांना वाव देतानाच बचत, गुंतवणूक, शिक्षण, संस्कार, आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा तारंगणांचा कलाविष्कार उत्साहात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *