
मुलाचा जागीच मृत्यू; गंभीर जखमी वडिलांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
खानापूर : लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या वडिलांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने लक्केबैल व लोकोळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात पुंडलिक अशोक नांदुरकर (वय २३, रा. लक्केबैल) व त्यांचे वडील अशोक नांदुरकर (वय ६०) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक व अशोक नांदुरकर हे सोमवारी सकाळी काही कामानिमित्त दुचाकीवरून बेळगावच्या दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लोकोळी क्रॉस ते तोपिनकट्टी मार्गावरील एका वळणावर समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, पुंडलिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील अशोक नांदुरकर गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा टेम्पोचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पुंडलिक नांदुरकर हे उद्यमबाग परिसरात नियमितपणे कामासाठी जात होते, तर त्यांचे वडील अशोक हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालसाब गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे.
एकाच भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने नांदुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लक्केबैल तसेच लोकोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta