
खानापूर : तालुक्यातील हलकर्णी, होनकल, खेमेवाडी आणि हत्तरगुंजी क्रॉस परिसरातून जाणाऱ्या NH-4A (बेळगाव–पणजी) महामार्गावर सेवा रस्ते, वाहनांसाठी अंडरपास (VUP) आणि स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केली आहे.
यासंदर्भात खासदार कागेरी यांनी दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) धारवाड प्रकल्प अंमलबजावणी विभागाच्या (PIU) प्रकल्प संचालकांना निवेदन सादर केले आहे. भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी यांनी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदारांकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे निवेदन देण्यात आले.
हलकर्णी, होनकल, खेमेवाडी आणि हत्तरगुंजी परिसर मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्राचा असून, शेतकरी, पादचारी, विद्यार्थी तसेच पशुधनाला महामार्ग ओलांडताना दररोज धोका पत्करावा लागत आहे. विशेषतः होनकल क्रॉस आणि हत्तरगुंजी क्रॉस येथे सुरक्षा सुविधांचा अभाव असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
सुरू असलेल्या कामांत सुविधांचा समावेश करण्याची मागणी
महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने NHAIच्या सुरू असलेल्या कामांमध्ये पुढील सुविधांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
– होनकल–हलकर्णी–खेमेवाडी–हत्तरगुंजी जोडणारे सेवा रस्ते
– महामार्ग ओलांडण्यासाठी Vehicular Underpass (VUP)
– महत्त्वाच्या चौकांवर स्ट्रीट लाईट व हाय-मास्ट लाईट
महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना स्थानिक शेतकरी, विद्यार्थी, पादचारी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी या सुविधा अत्यावश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन मागण्यांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित NHAI अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती खासदार हेगडे-कागेरी यांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta