Sunday , September 20 2026
Breaking News

सोगल सोमनाथ येथे श्रावणातील शेवटचा सोमवार भक्तिभावात

Spread the love

 

 

शिवमय वातावरणात निसर्गाचा जलाभिषेक; जोरदार पावसाने मंदिर परिसर जलमय, भक्तांची मोठी गर्दी

सोगल : श्रीक्षेत्र सोगल सोमनाथ येथे श्रावण मासातील शेवटचा सोमवार अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच सोमनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

श्रावणातील अंतिम सोमवार असल्याने पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ झाला. शिवलिंगावर विधिवत अभिषेक करण्यात आला. फुलांची व बेलपत्रांची आकर्षक आरास करण्यात आली. गोड पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून धार्मिक पद्धतीने पूजा-अर्चा पार पडली. भाविकांसाठी शिवलिंगावर अभिषेक करण्याची विशेष सोय करण्यात आली होती. त्यामुळे दर्शनाबरोबरच अभिषेकासाठीही भाविकांची रांग लागली होती.

जणू निसर्गानेच केला सोमनाथाचा जलाभिषेक!

दिवसभर परिसरात ढगाळ वातावरण होते. कधी ऊन तर कधी आकाशात दाटून येणारे काळेकुट्ट ढग, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दुपारी सुमारे तीनच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्तीने भारलेल्या वातावरणात झालेल्या या पावसामुळे जणू निसर्गानेच सोमनाथाच्या शिवलिंगावर जलाभिषेक केला, असा भक्तिमय अनुभव भाविकांना आला. मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरात पाणी साचून काही काळ आवार जलमय झाले. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची काही काळ तारांबळ उडाली; मात्र पावसाची पर्वा न करता अनेक भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले.

प्रसादासाठीही भाविकांची गर्दी

दुपारच्या सुमारास भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसादाचा लाभ घेण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सोगल सोमनाथ परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दिवसभर भक्ती, श्रद्धा, जयघोष आणि निसर्गाची बरसात यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. श्रावणातील अंतिम सोमवार सोगल सोमनाथ येथे भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *