Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा रुग्णालयाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांची भेट; त्रुटी दूर करण्याच्या सूचना

Spread the love

 

 

बेळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला व रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ. चौधरी यांनी सोमवारी (दि. ७) बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा व व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी काही त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना रक्त तपासणीसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात जावे लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

प्रसूतीनंतरच्या महिलांसाठी केवळ एकच शौचालय असून त्याठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने महिलांची गैरसोय होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत उपचारासाठी येणाऱ्या महिला व गर्भवतींसाठी सन्मानजनक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांवर दडपशाही अथवा धमकीचे प्रकार झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही डॉ. चौधरी यांनी दिला. अशा प्रकरणांत संबंधित महिला अधिकाऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, रुग्णालयात महिला व इतर रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असेही महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, बेळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध तालुका रुग्णालयांमध्ये नागरिक व रुग्णांना भेडसावणाऱ्या गैरसोयी, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय त्रुटींची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी ‘लिंगत्व आणि लैंगिक बहुलतेसाठी चळवळ’ या संघटनेच्या वतीने आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम, बिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प, बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी रेश्मा ताळिकोटी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदीश, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोज तिगडी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *