Sunday , September 20 2026
Breaking News

रांगोळीच्या रंगांतून समाजप्रबोधनाचा संदेश

Spread the love

 

 

कविता गांगुर, अर्पिता रायकर ठरल्या विजेत्या

बेळगाव : श्री भक्ती महिला सहकारी पतसंस्था, श्री राजमाता महिला बहुउद्देशीय संस्था, श्रीमाता सहकारी पतसंस्था आणि ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणेश महोत्सव २०२६’ मध्ये विविध उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या मुक्तहस्त रांगोळी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी रंगांच्या माध्यमातून कलाविष्कारासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत झालेली ही स्पर्धा १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत घेण्यात आली. स्पर्धकांना २.५ बाय २.५ फूट आकाराची रांगोळी काढण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला होता. पारंपरिक रांगोळ्यांसोबतच निसर्ग, फुले, पक्षी, देवी-देवतांच्या प्रतिमा तसेच विविध सामाजिक विषयांवर आधारित रांगोळ्या साकारण्यात आल्या.

‘सामाजिक माध्यमांचा अतिरेक टाळा’, ‘ध्वनी व जलप्रदूषण रोखा’, ‘नशामुक्त समाज घडवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अशा संदेशांना रांगोळीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले. त्यामुळे या रांगोळ्या केवळ कलाविष्कार न ठरता समाजाला जागृत करणाऱ्या ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण श्रीकृष्ण अंसुरकर आणि प्रतिभा निघून यांनी केले.

१८ वर्षांवरील गटात कविता गांगुर यांनी प्रथम, शुभांगी कुरंगे यांनी द्वितीय, तर लक्ष्मी घोडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ज्योती पटेल, सौम्या बैकेरीकर आणि संचिता बाईकरीकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

१८ वर्षांखालील गटात अर्पिता रायकर यांनी प्रथम, प्राजक्ता घोटणकर यांनी द्वितीय, तर सौम्या तावरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सिया शेठ आणि लावण्या तावरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांना राजमाता संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा देसाई आणि भक्ती संस्थेच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित संचालक मंडळाच्या वतीने श्री गणेशाची आरती करण्यात आली. ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्य व गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.

दरम्यान, महोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांतर्गत मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता न्यू गुड्सशेड रोड येथील श्रीमाता संस्थेच्या सभागृहात ‘नक्षत्र ग्रुप’ प्रस्तुत मंगळागौर आणि सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *