
बेळगाव : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका महिलेच्या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून, तिची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील कुलगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौजलगी गावाजवळ ही घटना घडली. मृत महिलेची ओळख अन्नपूर्णा सिद्धप्पा ओडचन्नावर (वय ३४, रा. तिगडी) अशी झाली आहे. ती कौजलगी गावात शेतीची कामे करीत होती.
अन्नपूर्णा गेल्या सुमारे महिनाभरापासून बेपत्ता होती. याप्रकरणी कुलगोड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान अन्नपूर्णा हिचे गोकाक तालुक्यातील सिमलापूर येथील दिलीप गडकरी (वय ३७) याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीपचा शोध सुरू केला. मात्र, पोलिस तपासाची माहिती मिळताच तो गावातून फरार झाला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने अन्नपूर्णाची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याची माहितीही चौकशीत समोर आली असून, हे दागिने त्याने आपल्या दुचाकीत ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उसाच्या शेतात शोधमोहीम राबविली असता महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळी कवटी, हाडे तसेच साडी आणि चप्पल आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, दागिन्यांसाठी हा खून करण्यात आला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta