
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार श्री असिफ (राजू) शेठ यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजातील १८ गरीब व गरजू बांधवांना सुसज्ज व्यावसायिक खोकी (दुकाने) उपलब्ध करून देण्यात आली. या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आमदार राजू शेठ यांच्या हस्ते करण्यात आले.
समाज कल्याण विभाग आणि डॉ. बाबू जगजीवन राम विकास निगम (लीडकर) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. चर्मकार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना सन्मानाने व्यवसाय करता यावा, या उद्देशाने आधुनिक व सुसज्ज व्यावसायिक खोकी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
समाज कल्याण कार्यालयात आयोजित प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात समाज कल्याण विभागाचे अधिकारी, लीडकर बोर्डाचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते संतोष होंगल सर तसेच महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लताताई शिवाजीराव माने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार राजू शेठ म्हणाले की, स्थानिक पातळीवरील कष्टकरी व गरजू बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. या सुसज्ज व्यावसायिक खोक्यांमुळे चर्मकार बांधवांना हक्काची व्यवसायाची जागा मिळणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी मदत होणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी लीडकर बोर्डाचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष होंगल यांनी सुरुवातीपासून विशेष प्रयत्न करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही शासकीय योजना १८ गरीब व गरजू लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचली, असे यावेळी सांगण्यात आले.
समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आमदार असिफ (राजू) शेठ यांची बीयूडीए अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व लाभार्थी व चर्मकार समाजबांधवांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष होंगल तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला हिरालाल चव्हाण, देवेंद्र कांबळे, बच्चू दादा कांबळे, प्रमोद अण्णा चिकोर्डे, परशुराम तोरे, सागर लाटे, शिवाजी कांबळे, संजय चौगुले, मुनेश्वर कुऱ्हाडे, राजू (दादा) कांबळे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta