Sunday , September 20 2026
Breaking News

कॅन्टोनमेंट मराठी शाळेत विद्यार्थिनींसाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

Spread the love

 

स्वसंरक्षणासोबत आत्मविश्वास आणि शारीरिक सामर्थ्य वाढविण्यावर भर; विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये मोफत स्विमिंग प्रशिक्षणाची घोषणा

बेळगाव : कॅम्प परिसरातील कॅन्टोनमेंट मराठी मुलामुलींच्या शाळेत विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक सक्षमीकरणासाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना किरण जाधव यांनी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आजच्या बदलत्या परिस्थितीत मुलींनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम होणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि संकटाच्या वेळी स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता तिच्यात असली पाहिजे. लाठी प्रशिक्षण हे त्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, मातोश्री जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून शौर्य, धैर्य, स्वसंरक्षण आणि शस्त्रविद्येचे संस्कार दिले. त्याच प्रेरणेतून आजच्या विद्यार्थिनींनाही सक्षम बनविण्याची गरज आहे. मुलींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता धैर्याने सामोरे जावे आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सक्षम व्हावे, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शाळेतील मुलींना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही. त्यांना क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, स्वसंरक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. सक्षम आणि आत्मविश्वासू विद्यार्थीनीच भविष्यात कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात,” असेही किरण जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर करताना जाधव यांनी ऑक्टोबर महिन्यातील सुट्टीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्विमिंग प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा केली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, कॅन्टोनमेंट बोर्डचे सदस्य सुधीर तुपेकर, राजन जाधव, तसेच शिल्पा केकरे, प्रियांका कलघटकर, आरती पाटोळे, भंडारी हनुमंत कागलकर, माधुरी माळी, बन्नूर दिनेश रावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाठी प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभामुळे कॅन्टोनमेंट मराठी शाळेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये धैर्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *