
मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांतून संस्कृती-परंपरेचा जागर
बेळगाव : पटवर्धन लेआउट, वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यातील सण-उत्सवांचे महत्त्व, त्यामागील सांस्कृतिक परंपरा आणि वारसा जाणून घेत श्रावण उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर प्रीती कामकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी चौगुले यांच्या हस्ते महापौर प्रीती कामकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, विविध मनोरंजनात्मक उपक्रम तसेच सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. श्रावणातील सण-परंपरांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
पारंपरिक वेशभूषा, मंगळागौरीचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवाला विशेष रंगत आली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. मंडळाच्या महिला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिती शिंदे, ऐश्वर्या पाटील, अपर्णा भंडारी आणि वनीता बिर्जे यांचे विशेष सहकार्य लाभले. उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात श्रावण उत्सवाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta