
नवरत्न सन्मानाने आज बुधवारी श्री गणेश फेस्टिवलची सांगता
बेळगाव : मराठमोळ्या पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मंगळागौरीचा उत्साह मंगळवारी श्री गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावर अनुभवायला मिळाला. नक्षत्र ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीची गीते तसेच घागर, झिम्मा, फुगडी यांसह विविध पारंपरिक खेळ सादर करून समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे मनोहारी दर्शन घडविले.
श्री गणेश फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी नक्षत्र ग्रुप, बेळगावच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम सादर करण्यात आला. कै. स्मिता पाठक यांनी रुजविलेल्या मंगळागौर उपक्रमाची परंपरा प्राजक्ता बेडेकर पुढे नेत आहेत. नक्षत्र ग्रुपच्या भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत व्यासपीठावर प्रवेश करत सर्वप्रथम गणेशस्तवन आणि देवीचा जागर सादर केला. त्यानंतर पारंपरिक खेळ आणि गीतांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.
नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी नटलेल्या महिलांनी वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, आगोटा-पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम-पडवळ घुम, दिंड आणि घोडा आदी विविध खेळ उत्स्फूर्तपणे सादर केले. त्यांच्या तालबद्ध हालचाली, उत्साह आणि पारंपरिक गीतांनी वातावरण अक्षरशः भारावून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
मंगळागौर हा केवळ मनोरंजनाचा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रकार नसून त्यामागे आरोग्य आणि सामाजिक एकोप्याचीही परंपरा आहे. पारंपरिक खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना हालचाल मिळून व्यायाम होतो. पूर्वी घरकामात व्यस्त असलेल्या महिलांसाठी हे खेळ आनंद, मनोरंजन आणि स्नेहबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे माध्यम होते. बदलत्या काळातही या लोकपरंपरा जपण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
श्रद्धा, परंपरा, मनोरंजन आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या मंगळागौर कार्यक्रमाने श्री गणेश फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवसाला विशेष रंगत आणली.
नवरत्न सन्मानाने उद्या सांगता
यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलचा समारोप बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता गुड्स रोड येथील श्रीमाता सभागृहात होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘नवरत्न सन्मान’ करून गौरव करण्यात येणार असून, त्यानंतर श्री गणेश फेस्टिवलची सांगता होईल.

Belgaum Varta Belgaum Varta