Sunday , September 20 2026
Breaking News

युवा समिती सीमाभागच्या पाठपुराव्याची दखल; मराठी-उर्दू शिक्षक भरतीसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कर्नाटक सरकारकडे पाठवली निवेदने

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याची जिल्हा शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीबाबत सादर करण्यात आलेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहेत.

कर्नाटक सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे १५ हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना जारी केली होती. बेळगाव जिल्ह्यासंदर्भातील या भरती अधिसूचनेमध्ये मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याने मराठी भाषिक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदने सादर केली होती.

या निवेदनांमध्ये मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांनाही शिक्षक भरतीमध्ये संधी देण्यात यावी, तसेच याबाबत आवश्यक सुधारणा करून नवीन अधिसूचना काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला होता.

१८ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रात १२ ऑगस्टच्या शिक्षक भरती अधिसूचनेसंदर्भातील निवेदने तसेच १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित निवेदने पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी शिक्षण विभाग, कर्नाटक सरकार, बेंगळूर यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट होते.

बेंगळूरमध्येही डीएड, बीएड विद्यार्थ्यांचा पाठपुरावा

दरम्यान, बेंगळूर येथे अधिवेशनाच्या काळात डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांनी संबंधित मंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीचा मुद्दा मांडला होता. या पाठपुराव्यानंतर मराठी माध्यमासाठी २०० आणि उर्दू माध्यमासाठी ८०० जागांचा प्रस्ताव मान्य झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, मराठी माध्यमासाठी ८०० ते ९०० शिक्षकांची भरती करण्यात यावी, अशी पात्र उमेदवारांची मागणी असून, सध्या मान्य झालेल्या २०० जागांमध्ये वाढ करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.

सरकारच्या पुढील निर्णयाकडे सीमाभागाचे लक्ष

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेऊन ती राज्याच्या शिक्षण विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याने मराठी भाषिक आणि शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या डीएड, बीएड पदवीधर उमेदवारांना आशेचा किरण दिसला आहे.

मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या वाढीव जागा मंजूर करून सुधारित अधिसूचना कधी जारी होणार, याकडे आता सीमाभागातील मराठी भाषिक तसेच हजारो पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

“मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार; शासनाने केवळ प्रस्ताव न ठेवता प्रत्यक्षात मराठी माध्यमाच्या जागा वाढवून सुधारित अधिसूचना काढावी,” अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर समितीने व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *