
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानीही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. गिरीश सोनवाळकर यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेळगाव शहरातील लक्ष्मी टेक परिसरातील डॉ. गिरीश सोनवाळकर यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून, विविध कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाची माहिती तपासली जात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीकडून तपासणी सुरू असतानाच त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानीही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ईडीच्या या कारवाईमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. तसेच तपासणीदरम्यान कोणती कागदपत्रे किंवा माहिती हाती लागली, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ईडीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta