Sunday , September 20 2026
Breaking News

सतीश जारकीहोळी यांच्या निवासावरील ईडी छाप्याचे कारण वेगळे; मंजुनाथ प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळुरू आणि बेळगाव येथील निवासस्थानांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छाप्याचा मंजुनाथ प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

ईडीकडून परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)-१९९९ अंतर्गत सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानांसह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर शोधमोहीम राबविण्यात आली आहे. परदेशातील कथित बेकायदेशीर गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने ही तपासणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळुरू येथील डॉलर्स कॉलनीमधील निवासस्थानावर छापा टाकला. यापूर्वी जून महिन्यात मंजुनाथ यांच्या निवासस्थानासह बेंगळुरू, बेळगाव, म्हैसूर आणि अथणी परिसरात ईडीने छापे टाकून तपास केला होता.

त्या वेळी उत्पादन शुल्क परवान्यांमधील कथित गैरव्यवहार, बेनामी बार परवाने आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी सुरू असल्याचे वृत्त होते. त्यामुळे जारकीहोळी यांच्या निवासस्थानावरील कारवाई ही मंजुनाथ प्रकरणाचाच पुढील भाग असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ईडीच्या अधिकृत स्पष्टीकरणामुळे ही दोन्ही प्रकरणे स्वतंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिण आफ्रिका आणि युगांडातील गुंतवणुकींची चौकशी

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित कारवाई ही फेमा-१९९९ अंतर्गत सुरू असलेल्या स्वतंत्र प्रकरणाशी निगडित आहे. दक्षिण आफ्रिका, युगांडासह विविध देशांमध्ये कथितरीत्या बेकायदेशीर गुंतवणूक करण्यात आल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चौकशी केली जात आहे.

या परदेशी गुंतवणुकींसाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बाजूने कोणत्याही प्रकारचा निधी अथवा गुंतवणूक करण्यात आली आहे का, याची तपासणी ईडीचे अधिकारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *