
दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, भक्तगण तसेच मुंबई ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे सलामवाडीसह पंचक्रोशी परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री हनुमान मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी स्वेच्छेने योगदान देत धार्मिक कार्यात सहभाग नोंदविला.
या धार्मिक सोहळ्यास परमपूज्य श्री. म. नि. प्र. गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर सुक्षेत्र मठ, हत्तरगी यांचे दिव्य सान्निध्य लाभले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
धार्मिक विधींना उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळपासून ८ ते ११ वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडले. यामध्ये मुहूर्तमेढ रोवणे, गणेशपूजा, पुण्याहवाचन, नवग्रह पूजा, सूत घालणे तसेच होम-हवन आदी विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
यानंतर गावातील विविध गल्लींतून कळसाची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला, युवक व बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धार्मिक घोषणांनी व भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला.
सकाळी ११ वाजता श्री हनुमान मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता कळसारोहण व प्रवचनाचा कार्यक्रम परमपूज्य गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडला. यावेळी स्वामीजींनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करत धार्मिक संस्कार, सामाजिक एकोपा आणि गावातील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महाप्रसादाचे आयोजन
दुपारी २ वाजता उपस्थित भक्तगण व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
भजनाने रंगला रात्रीचा जागर
रात्री श्री भावेश्वरी भजनी मंडळ, सलामवाडी यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध भक्तिगीते व अभंगांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. भाविकांनी रात्री उशिरापर्यंत भजनाचा आनंद घेत श्री हनुमानाचा जागर केला.
या मंगल धार्मिक सोहळ्यास सलामवाडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भक्तगण, दानशूर व्यक्ती, महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिरामुळे गावाच्या धार्मिक व सामाजिक एकतेला नवी दिशा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन हनुमान सेवा मंडळ, सलामवाडी ग्रामस्थ व मुंबईस्थित ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले. मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे व ग्रामस्थांचे उपस्थितांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta