Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सव मंडळांची परवानगीसाठी उदासीनता; शेवटच्या टप्प्यात होणार धावपळ

Spread the love

 

एक खिडकी सुविधेतून २७३ पैकी केवळ २० मंडळांनी घेतली परवानगी; २५३ मंडळे अद्याप प्रतीक्षेत

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांकडून गणरायाच्या आगमन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असतानाच, उत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या घेण्याकडे मात्र मंडळांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात मंडळांची मोठी धावपळ होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारणी, विद्युत जोडणी, ध्वनिक्षेपक यंत्रणा, अग्निसुरक्षा यांसह विविध बाबींसाठी आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वयातून शहरातील संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ‘एक खिडकी सुविधा’ सुरू करण्यात आली आहे. मंडळांची धावपळ कमी व्हावी आणि सर्व आवश्यक परवानग्या वेळेत मिळाव्यात, हा या सुविधेमागील उद्देश आहे.

मात्र, या सुविधेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील २७३ गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी सुविधेअंतर्गत परवानगी घेणे आवश्यक असताना आतापर्यंत केवळ २० मंडळांनीच परवानगी घेतली आहे. तब्बल २५३ मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, हेस्कॉमनेही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे विभागनिहाय तीन विभाग केले आहेत. यामध्ये पहिल्या विभागातील केवळ ८, दुसऱ्या विभागातील ५ आणि तिसऱ्या विभागातील ७ मंडळांनी आवश्यक परवानगी घेतली आहे.

गणेशोत्सवात मंडप, विद्युत व्यवस्था आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेसह अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, उत्सव जवळ येऊन ठेपला असतानाही बहुतांश मंडळांनी अद्याप परवानगी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात प्रशासनाकडे परवानगीसाठी गर्दी होऊन मंडळांची धावपळ वाढण्याची शक्यता आहे.

उत्सवाच्या तयारीसोबतच आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *