
दोन-तीन दिवसांत मानधन खात्यात जमा होणार
बेंगळूरू :राज्यातील सरकारी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो अतिथी शिक्षकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित असलेल्या अतिथी शिक्षकांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी सरकारने अनुदान मंजूर केले असून, येत्या दोन-तीन दिवसांत मानधन शिक्षकांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
सरकारी शाळांमधील शैक्षणिक कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी जून महिन्यात मोठ्या संख्येने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीच्या वेळी दरमहा मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र नियुक्तीनंतर तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित राहिल्याने अतिथी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
सरकारी शाळांचा मोठा शैक्षणिक भार अतिथी शिक्षकांवर अवलंबून असतानाही त्यांचे मानधन रखडल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले होते. गणेशोत्सव तोंडावर आल्याने प्रलंबित वेतन तातडीने जमा करावे, अशी मागणी अतिथी शिक्षकांकडून करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत सरकारने तीन महिन्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी आवश्यक अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे वेतन वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून, तुटपुंज्या मानधनावर शिक्षणसेवा बजावणाऱ्या हजारो अतिथी शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta