Sunday , September 20 2026
Breaking News

अष्टविनायक गणरायाच्या आगमनाने बेळगावात घडणार इतिहास!

Spread the love

 

८० फूट रुंदीची तीन ट्रॉल्यांवर साकारलेली भव्य मूर्ती; पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार आगमन सोहळा

बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाची शान मानल्या जाणाऱ्या येळूर रोड, वडगाव येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याला यंदा ऐतिहासिक भव्यतेची किनार लाभणार आहे. तब्बल ८० फूट रुंदीची आणि तीन ट्रॉल्यांवर विस्तारलेली भव्य-दिव्य गणेशमूर्ती हे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

मूर्तिकार मनोहर पाटील, विनायक पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या संकल्पनेतून ही विराट मूर्ती साकारण्यात आली आहे. मुंबईच्या धर्तीवर दरवर्षी बेळगावचा गणेशोत्सव अधिकाधिक भव्य होत असताना, अष्टविनायक मंडळाची यंदाची मूर्ती आणि आगमन सोहळा गणेशोत्सवाच्या वैभवात नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे.

गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बॉम्बेहूपर येथे गणरायाचा प्रथम दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवानी धोपगावकर मानवंदना देणार आहेत.

सायंकाळी ६ वाजता सोनार गल्ली येथून गणरायाच्या आगमन सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर येळूर रोडमार्गे भव्य मिरवणुकीने गणरायाचे अष्टविनायक मंडपात आगमन होणार आहे.

आगमन सोहळ्यात वज्रनाथ ढोल-ताशा पथक, गंगा आरती आणि आतषबाजी यांची रंगत पाहायला मिळणार आहे. यासोबतच एम.एस. इव्हेंट, ऋषी लाईट, कुंज एलईडी पोल आणि वक्रतुंड साऊंड यांच्या माध्यमातून सोहळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनी व दृश्य परिणामांची जोड मिळणार आहे.

विराट गणेशमूर्ती, पारंपरिक वाद्यांचा निनाद, रोषणाई आणि आतषबाजीच्या जल्लोषात साकारला जाणारा हा आगमन सोहळा बेळगावच्या गणेशोत्सवातील अविस्मरणीय क्षण ठरण्याची शक्यता आहे.

या ऐतिहासिक आगमन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *