

खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी बुधवारी सायंकाळी देसाई गल्ली गणपती मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती लावली.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. निंबाळकर यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे व वाहनाचे पूजन करण्यात आले. तसेच गणरायाच्या मूर्तीवरील पडदा बाजूला करून मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
शिवस्मारक चौकात विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. डॉ. निंबाळकर यांनी सुमारे दीड तास सोहळ्यात उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली.
यावेळी मंडळाच्या वतीने डॉ. निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भगवी शाल व पांढरी गांधी टोपी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. परिसरात गणपती बाप्पाच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta