
बेळगाव : मराठी भाषिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करावी, तसेच मतदार याद्या मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. समितीसाठी मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींची नावेही सादर करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप समितीची स्थापना झालेली नाही. त्यामुळे ही समिती लवकरात लवकर स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालय तसेच राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिसूचनेनुसार मतदार याद्या मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मराठी भाषिकांच्या प्रशासकीय व निवडणूकविषयक हक्कांच्या दृष्टीने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, ऍड. एम जी पाटील, रणजित चव्हाण पाटील, ऍड. अमर यळूरकर, नेताजी जाधव, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, उमेश पाटील, शेखर पाटील, प्रकाश गडकरी, एस आर पाटील आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta