
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते किल्ला तलावाच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. लघु पाटबंधारे विशेष निधीअंतर्गत या विकासकामासाठी ₹3.85 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून तलावाच्या परिसरात दगडी पिचिंग, पेव्हर ब्लॉक, फेन्सिंगसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. तलावाची पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच परिसराचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना आमदार आसिफ (राजू) सेठ म्हणाले की, किल्ला तलावाच्या विकासामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार असून, भविष्यात या तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचीही शक्यता आहे. तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन विभागाशी संपर्क साधण्यात आला असून, पर्यटनाच्या दृष्टीने परिसरात आणखी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ला तलावाला बेळगावमधील प्रमुख सार्वजनिक व पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देत नागरिकांना चांगले वातावरण आणि मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार सेठ यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवा नेते अमान सेठ, स्थानिक नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta