
सामाजिक उपक्रमांतून ६० हजारांची मदत; पत्रकार अनंत लाड यांचा सत्कार
बेळगाव : लायन्स क्लब बेळगाव टिळकवाडीच्या वतीने ५३ वा चार्टर नाईट सोहळा लायन्स भवन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा गव्हर्नर ला. राजशेखर हिरेमठ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष ला. राजेंद्र कागवाड होते.
चार्टर नाईटनिमित्त सकाळच्या सत्रात शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संगमेश्वरनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रमास स्टीलचे कपाट देणगी देण्यात आले. माहेश्वरी अंध विद्यालयास भेट देऊन आर्थिक मदत करण्यात आली. तसेच व्हॅक्सिन डेपो मैदान येथे सिमेंटच्या बाकांचे उद्घाटन करण्यात आले.
टिळकवाडी येथील गुरुप्रसाद कॉलनीमधील आनंद यात्री वृद्धाश्रमास किराणा साहित्य, साबण, डिटर्जंट पावडर, फिनाईल आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या विविध सामाजिक उपक्रमांसाठी एकूण ६० हजार रुपयांचे साहित्य व आर्थिक मदत देण्यात आली.
पत्रकार अनंत लाड यांचा गौरव
शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान देणारे पत्रकार अनंत लाड यांचा यावेळी शाल, पुष्पहार आणि फळांची करंडी देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत उपस्थितांनी कौतुकाचे उद्गार काढले.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ला. राजेंद्र कागवाड यांनी केले. क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती सचिव ला. प्रकाश मुर्कीभावी यांनी दिली. यावेळी खजिनदार ला. मल्हारी दिवटे, माजी प्रांतपाल श्रीकांत शानभाग, श्रीनिवास शिवणगी, डॉ. भांदुर्गे, ला. अरविंद कलघटगी, प्रथमेश टपाले, ला. रमेश हन्नीकेरी, ला. मधुकर मोटर यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta