
खानापूर : इदलहोंड येथील बसस्थानकापासून जाणारा रस्ता तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्येची दखल घेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष शंकर पाखरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते यशवंतराव पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील, राहुल पाटील, शुभम पाटील, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी श्रमदान करून रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
गणेश चतुर्थीच्या काळात या मार्गावरून मोठ्या संख्येने भाविकांची ये-जा होणार असल्याने त्यांच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी हा उपक्रम करण्यात आला. कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून रस्ता दुरुस्ती केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमातून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta