
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा इशारा; सार्वजनिक गणेश मंडळांना मातीच्या मूर्तींचे आवाहन
बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक हित लक्षात घेऊन हा नियम लागू करण्यात आला असून, सर्वांनी त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मातीच्या गणेश मूर्तींच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांकडून घरगुती गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही, असे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनेही प्रशासन गंभीर असून, यंदा नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Belgaum Varta Belgaum Varta