
गणेशोत्सव मंडळाच्या पाठपुराव्याला यश; विविध विभागांचा समन्वय
बेळगाव : कंग्राळ गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंग्राळ गल्लीतील लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत वाहिन्यांचा प्रश्न पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडला होता. या मागणीची दखल घेत आता कंग्राळ गल्लीमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील, नगरसेवक शंकर पाटील, मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ होसूरकर, सूरज काकतकर, सुहास चौगुले, ओंकार कंग्राळकर, हेमंत शंभूचे, विनायक सांबरेकर, रोहन निलकंठाचे, मयूर मोरे, पंकज पाटील आदींनी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, महापालिका आयुक्त श्री. कार्तिक तसेच हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता गडगकर यांची भेट घेऊन या कामासाठी पाठपुरावा केला.
पोलीस विभाग, महापालिका आणि हेस्कॉम या विविध विभागांनी मंडळाच्या सहकार्याने समन्वय साधत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे गणेशोत्सव काळात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी मार्गदर्शन करून मंडळाला वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून देण्यासाठी शरद पाटील यांनी विशेष सहकार्य केले. विविध विभागांच्या समन्वयातून प्रश्न मार्गी लागल्याने कंग्राळ गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta