Sunday , September 20 2026
Breaking News

बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत भक्तांची जत्रा

Spread the love

 

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या; रविवारी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी

बेळगाव : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. कल्पकतेला आणि कलाविष्काराला वाव देणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीने घराघरांत लगबग सुरू झाली असून, त्याचे प्रतिबिंब रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये उमटले. गणेशोत्सवासाठी आवश्यक सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये अक्षरशः भक्तांची जत्राच भरली होती.

गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्या. आकर्षक पडदे, रंगीत कागद, प्लास्टिकची फुले, तोरणे, रांगोळी, चौरंग, मखर, फुलांच्या कमानी, मोत्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी होती. आपल्या घरातील बाप्पाची सजावट हटके आणि आकर्षक दिसावी, यासाठी नागरिकांकडून विविध साहित्याची बारकाईने निवड केली जात होती.

सजावटीसोबतच गणरायाच्या पूजेसाठी लागणारी फुले, फळे, हार, पूजेचे साहित्य आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी झाली होती. बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी तयार मखर, फुलांच्या कमानी आणि आकर्षक सजावटीचे साहित्य विक्रीसाठी मांडण्यात आले होते. रंगीबेरंगी साहित्य, फुलांचा सुगंध आणि बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत मग्न असलेले नागरिक यामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे गणेशमय झाले होते.

यंदा गणरायाचे आगमन सोमवारी होत असल्याने रविवारीची सुट्टी अनेकांनी बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी राखून ठेवली. सकाळपासूनच बाजारहाट, घरांची स्वच्छता, सजावटीची तयारी, मखर उभारणी आणि पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव यामध्ये महिला, युवक आणि कुटुंबीय व्यस्त होते. त्यामुळे बाजारपेठांपासून गल्लीबोळांपर्यंत सर्वत्र ‘गणरायाच्या आगमनाची’ धामधूम पाहायला मिळाली.

बाप्पाच्या स्वागतासाठी सजलेले बाजार, उत्साहाने भारलेले भक्त आणि घराघरांत सुरू असलेली तयारी यामुळे रविवारी बेळगाव शहराला जणू गणेशोत्सवाच्या उत्सवाची चाहूल लागली होती.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *