
यूएसबी लाइट माळांना मागणी; ५० पेक्षा अधिक प्रकार
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवाला १ दिवस शिल्लक असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. अशोकनगर, चाटे मार्केट, बेळगाव नाका, जुना पीबी रोड परिसरातील इलेक्ट्रिक दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून विविध प्रकारच्या विद्युत माळा आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
यंदाच्या हंगामात बाजारात तब्बल ५० पेक्षा अधिक प्रकारच्या आकर्षक लायटिंग विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात यूएसबी लाइटच्या माळांना पसंती मिळत आहे. पारंपरिक दिव्यांपासून ते अत्याधुनिक
तंत्रज्ञानापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध असून घरगुती गणपतीसाठी छोट्या आकाराच्या लायटिंग, इलेक्ट्रिक समई, निरंजन, पणत्या माळा, झुंबर, फिरते लाइट्स् आणि डिस्को लाइट ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात संगीतय लाइट माळा, लेझर लाइट, इलेक्ट्रिक कारंजे, रंग बदलणारे फोकस, तसेच श्रीडी-टूडी लाइट, स्टार लाइट आणि ऑप्टिकल लाइटचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
एलईडी कंपन्यांकडून दिवे आणि साहित्याच्या किमतीत काहीशी घट झाल्यामुळे किरकोळ बाजारातही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ५० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या साहित्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta