
निपाणीत शांतता कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा ऊरूस बुधवार (ता.२२) पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त शहर पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ऊरूस उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावे. ऊरूस काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी यांनी दिला.
पुजेरी म्हणाले, येथील हिंद – मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिराने पीर दस्तगीरसाहेब यांच्या ऊरूसाकरीता भाविक दर्शनासाठी येत असतात. यावेळी गर्दी नियंत्रणासह भाविकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबध्द आहे. भाविकांनीही आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुकानदारांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ऊरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांनी ऊरूस काळात पोलीस प्रशासनाचे सहकार्य महत्वाचे आहे.त्यांच्या बरोबरीने उरूस उत्सव कमिटी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत राहिल असे सांगीतले. बैठकीस राजूबाबा सरकार, पृथ्वीराज चव्हाण, बक्तीयार कोल्हापुरे, कुतुबुद्दीन बागवान यांच्यासह उरूस कमिटी सदस्य उपस्थिती होती.

Belgaum Varta Belgaum Varta